महात्मा गांधी आणि हिंदुत्ववाद
![]() |
| (Image: Sarvesh) (credits: Mahatma Gandhi- wikipedia, V.D. Savarkar- counter view) |
आज ३० जानेवारी. महात्मा गांधींचा पुण्यदिन. महात्मा गांधींची हत्या आणि हत्या करणाऱ्या व्यक्तींच्या विचारसरणी यांबद्दल खूप गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. महात्मा गांधींच्या खुनानंतर महात्मा गांधी यांच्या खुनाचे समर्थन करणाऱ्या अनेक पुस्तकांत महात्मा गांधींची प्रतिमा धर्मद्रोही अशी केली आहे. गांधींच्या हत्येच्या कारणांपैकी खूप मोठे कारण धर्मद्रोह आहे असा आरोप केला जातो. त्यामुळे दोन्ही बाजू समजावून घेणे गरजेचे आहे.
* हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्म एकच आहे का?
१९२१ किंवा १९२२ मध्ये अंदमानात वि. दा. सावरकर लिखित 'इसेन्शिअल्स ऑफ हिंदुत्व' या पुस्तकामध्ये असं नमूद केलेले आहे की "हिंदू धर्म हा हिंदुत्वाचा एक लहानसा भाग आहे. हिंदुत्ववाद हा हिंदू कुळातील सर्व विचार आणि क्रियाकर्म मिळून बनला आहे. हिंदू धर्म हा फक्त आध्यात्मिक किंवा धार्मिक मतप्रवाहावर आधारित सिद्धांत आहे".
मात्र हिंदुत्ववाद ही संकल्पना हिंदू धर्माच्या खूप नंतर उदयाला आली, यात तिळमात्रही शंका नाही. हिंदू धार्मिक लेखांमध्ये हिंदूत्व या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. महात्मा गांधी आणि वि.दा. सावरकर यांच्या हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातही खूप तफावत जाणवते. सावरकरांनी 'इसेन्शिअल्स ऑफ हिंदुत्व' मध्ये नमूद केले आहे की, "वर्णव्यवस्था मान्य न करणारे म्लेंच्छ आहेत. व त्यांचा देश म्लेंच्छस्थान आहे. इतर उरलेला आणि वर्णव्यवस्था मानणारा भाग हा सप्त सिंधुस्थान किंवा हप्त हिंदुस्थान आहे. आणि त्याचे सर्व रहिवासी हिंदू आहेत".
![]() |
| (Credits: vector stock) |
* महात्मा गांधींंचे धर्माबद्दलचे विचार
महात्मा गांधींनी "धर्म म्हणजे आत्मभान - आत्मज्ञान." असे म्हणले आहे. त्यांंनी 'सत्याचेे प्रयोग' या आत्मकथनात एक आठवण सांंगितली आहे. "वडिलांपाशी जैनधर्माचार्यांंपासून कोणी न कोणी नेहमी येत. वडील त्यांंना भिक्षाही घालीत. ते वडिलांबरोबर धर्मासंबंधी व व्यवहारासंबंधी गोष्टी करत. याशिवाय वडिलांचे मुसलमान आणि पारशी मित्रही होते. ते आपल्या धर्माबद्दल गोष्टी बोलत, आणि वडील त्यांचे म्हणणे आदरपूर्वक व पुष्कळ वेळा काळजीपूर्वक ऐकत असत. या सर्व वातावरणाचा माझ्यावर असा परिणाम झाला की सर्व धर्मांबद्दल माझ्या मनामध्ये समान भाव उत्पन्न झाला."
महात्मा गांधी यांनी परदेशात असताना त्यांनी भगवद्गीतेचे सर्व इंग्रजी भाषेतील भाषांतरे वाचली. एडविन आर्नल्डचे भाषांतर त्यांना आवडल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे. पुढील अनेक वर्षानंतर गीता हा महात्मा गांधींच्या नित्य वाचनाचा ग्रंथ बनला. त्यानंतर त्यांनी आर्नल्डचे बुद्धचरित्र वाचले. त्यानंतर त्यांनी जुना करार, नवा करार आणि कार्लाइलचे 'विभूती आणि विभूतीपूजा' वाचून काढले. त्यानंतर "धर्म त्यागामध्ये आहे" ही गोष्ट त्यांनी नमूद केली आहे.
त्यांनी सत्याचे प्रयोग या त्यांच्या आत्मकथनात असे म्हणले आहे, "थिओसोफिकल सोसायटीने प्रसिद्ध केलेले उपनिषदांचे भाषांतर वाचले. माझा हिंदू धर्माबद्दलचा आदर वाढत चालला. त्यातील नव्या खुब्या मला समजू लागल्या. पण म्हणून मला इतर धर्मांबद्दल तिरस्कार वाटला नाही."
![]() |
| (Credits: currentkids) |
* महात्मा गांधी जातीबाहेर
आपण वर पाहिल्या प्रमाणे वि. दा. सावरकर यांनी लिहिले आहे की वर्णव्यवस्था न मानणारे म्लेंच्छ आहेत. मात्र महात्मा गांंधी ज्या वेळी बॅरिस्टर होण्यासाठी परदेशात समुद्रमार्गे जाणार होते, त्या वेळी ज्ञातीने महात्मा गांधींना हिंदू धर्मामध्ये समुद्र ओलांडून जाण्याची मनाई केली. मात्र महात्मा गांधींनी शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय मी परत घेऊ शकत नाही असे कळवले आणि त्यांना जाती बहिष्कृत ठरवण्यात आले.
हिंदुत्ववादामध्ये जातीय व्यवस्थेला पूर्व जन्माच्या पाप - पुण्याशी जोडले गेले आहे. पवित्रता आणि अपवित्रता याचा आधार घेत अस्पृश्यतेचे समर्थन केले आहे. महात्मा गांधींनी जातीय सुधारणेसाठी एकत्र भोजन पध्दती चालू केली. सवर्ण समजल्या जाणाऱ्या लोकांना शूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांना जी स्वच्छतेची कामे करावी लागतात ती कामे करायला लावली. व त्यांच्याबरोबर त्यात सहभाग नोंदवला. त्यांनी असे म्हटले आहे की, " अस्पृश्यता हे जर हिंदू धर्माचे अंग असेल, तर ते सडलेले आणि निरुपयोगी अंग असावे असे मला वाटते."
![]() |
| (Credits: Amazon) |
* महात्मा गांधी आणि मनुस्मृती
महात्मा गांंधी धार्मिक होते. त्यांनी असे म्हणले आहे की, " आज रामनाम ही माझ्या बाबतीत अमोघ शक्ती आहे." त्याचबरोबर ते म्हणतात, "अनेक आध्यात्मिक प्रसंगी, वकिली करताना, संस्था चालविताना, राजकारणात 'ईश्वराने मला वाचवले आहे', असे मी सांगू शकतो. सर्व आशा सुटावी, हातपाय गाळून बसण्याचा प्रसंग यावा, अशा प्रसंगी कोठून तरी मदत येऊन पोहोचते असे मला अनुभव आले आहेत. स्तुती, उपासना, प्रार्थना वगैरे गोष्टी झूट नाहीत; तर आपण खातो, पितो, बसतो, उठतो हे जितके खरे आहे, त्याहूनही या गोष्टी जास्त प्रमाणसिद्ध आहेत."
मात्र त्यांचे मनुस्मृतीबद्दलचे मत काहीसे वेगळे आहे. ते म्हणतात, " मनुस्मृतीमध्ये जगाच्या उत्पत्तीसंबंधी वर्णन वाचले. त्यावर श्रद्धा बसली नाही. उलट काहीशी नास्तिकताच उत्पन्न झाली. मनुस्मृतीच्या खाद्यखाद्य प्रकरणात व इतर प्रकरणातही मला चालू रीतिरिवाजांचा विरोधच दिसला. मनुस्मृती वाचून अहिंसेचे शिक्षण तर मिळाले नाहीच. मांसाचाराला तर मनुस्मृतीचा आधारचं मिळाला. सर्प, ढेकूण इ ना मारणे ही नितीच आहे असेही वाटले."
![]() |
| गोरक्षण (Credits- BBC hindi/ kirtish) |
* महात्मा गांधी आणि गोरक्षण
महात्मा गांधी आणि हिंदुत्ववादी यांची गोरक्षणाबद्दलची भूमिका सारखीच वाटते. हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते.दिल्लीमध्ये हिंदू - मुसलमानांची एक सभा होती. सदर सभेत खिलाफत आणि गोरक्षण या दोन मुद्द्यांचा विचार होणार होता. त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले, " खिलाफतीच्या प्रश्नामध्ये जर तथ्य असेल, त्या बाबतीत सरकारकडून जर खरोखरच अन्याय घडत असेल, तर मुसलमानांना पाठिंबा देणे हिंदूंचे कर्तव्य आहे. मग त्यांनी त्याच्याबरोबर गोरक्षण जोडू नये. अशा तऱ्हेची कसलीही अट घालणे हिंदूंना शोभणार नाही. खिलाफतीच्या कामी मिळणाऱ्या मदतीची किंमत म्हणून मुसलमानांनी गोवध बंद केला तर त्यांनाही ते शोभणार नाही. शेजारधर्म म्हणून किंवा आपण एकाच भूमीची लेकरे म्हणून, आणि हिंदूंच्या भावनांना मान देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र पणे गोवध बंद केला तर ते चांगले दिसेल. तसे करणे त्यांचे कर्तव्यही आहे."
फरक फक्त एवढाच की महात्मा गांधींनी कधीही गोरक्षण करण्यासाठी जमावाने हल्ला करा असे सांगितले नाही. महात्मा गांधी यांचे धार्मिक विचार जाणून घेणे खूप रंजक आहे. महात्मा गांधी हे धार्मिक होते, मात्र त्यांनी आपल्यातील विवेक नेहमी जागृत ठेवला. धर्म पाळत असतानाच विवेक जागृत ठेवणे ही तारेवरची कसरत आहे. एका बाजूला भावणीकता आणि दुसरी कडे विवेकी विचार शाबूत ठेवणं कठीणच आहे.
![]() |
| (Credits: Samalochan) |
म्हणायचं झालं तर महात्मा गांधींना हिंदुत्ववादी, सनातनी म्हणता येईल. मात्र त्यांचं व्यक्तिमत्व हे खूप क्लिष्ट आहे. नथुराम गोडसेने गोळी मारून गांधी आणि गांधीवाद संपवला असं म्हणलं जातं. गांधीवाद संपला की नाही माहीत नाही, मात्र सत्य, अहिंसा, सत्याग्रह, प्रेम ही वैश्विक मूल्य आहेत हे नक्की. या माणसाने या मूल्यांना पुढं घेऊन जाण्याचं काम निर्विवादपणे पूर्ण केलंय. गांधीवादाचं माहीत नाही, मात्र ही मूल्य चिरतरुण आहेत. आजतागायत!
लेखन, पेज एडिटिंग, इमेज : सर्वेश






Thanks for sharing. Great Blog! Keep it Up! As Gandhiji himself has said, "Be the change you want to see in the world!"
उत्तर द्याहटवाThanks. Your appreciation boosts me every time.
हटवाअप्रतिम blog...!
उत्तर द्याहटवाआपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हटवा