वैज्ञानिक दृष्टिकोन
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांतून मात्र आपण अत्यंत अवैज्ञानिक आहोत हेच प्रतित होते. रस्त्यावरुन चालताना अनेक ठिकाणी [विशेष करुन चौक, तिठा(का ते ठाऊक नाही)] येथे लिंबू, हळद, कुंकू, नारळ, भात,इ.. गोष्टी उतारा म्हणून टाकलेल्या दिसतात. आपले आयुष्य व त्यातील समस्यांची सोडवणूक करुन त्यांची उकल करण्याऐवजी हे पदार्थ अशा कोपऱ्यांवर ठेवून काही साध्य होणार नाही हा साधा विचारही आपण करत नाही. त्यामुळे जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणारे आपण प्रत्यक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सुयोग्य वापराबाबत अत्यंत पिछाडीवर आहोत हेच सिद्ध होते.
मी माझ्या बालवयात अनेकदा पाहिलेली घटना सांगतो. शेजारच्या काकुंना स्वप्नात लहान मुलगी दिसली. अविवाहित स्त्रीला असेही चेटुक मानले जाते. ती मुलगी स्वप्नात घराच्या स्लॅबवर बसून रक्त मागत होती. त्या काकू लगेच सकाळी पडलेलं स्वप्न शेजारच्या स्त्रियांना सांगायला लागल्या. एका काकुंनी त्यांना मांत्रिकाकडे जायला सांगितले. त्या मांत्रिकाने त्यांना जवळच्या बहिरीदेवीला नवस करण्यास सांगितले.
झालं..... साधा सोपा उपाय त्यांना लगेच पटला. व त्या तीन डोंगर चढून बहिरीदेवीच्या दर्शनाला जाऊ लागल्या.तिथे एका बुवाने यातून सुटका होण्यासाठी आषाढ महिन्यात उलट्या पंखांची काळी कोंबडी देण्याचा सल्ला दिला.व ते सगळे विधी व त्या कोंबडीचे भक्षण फक्त पुरुषच करु शकतात,हे अजब तर्कट मांडायला तो विसरला नाही.
काळी(च!!) कोंबडी मारुन तिची मान,काळीज,शिजवलेला भात भूताला(!) देण्यासाठी जमिनीत पुरणे हा उपायचं मुळी पुरुषी चंगळवाद आहे.त्यात अनेकदा सर्रास दारु पिणे हाही प्रकार घडतो.बिचाऱ्या कोंबडीला कापून त्या अदृश्य भुतांची पोटे भरायची,का पुरुषांची?.हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.यामध्ये स्त्रियांनी जेवण बनवणे,बनवणाऱ्या खोलीत प्रवेश करणेही वर्ज्य आहे.
आपण याचं विश्लेषण करु.मुळात स्वप्न ही गोष्ट आठवणीत असणाऱ्या गोष्टींचे,घटनांचे चित्रित स्वरुपात होणारे परावर्तन आहे.आपण झोपतो तेव्हा आपल्या मेंदूचा काही भाग हा जागृत असतो.आपण दिवसभर करणाऱ्या गोष्टी आपल्या इतर शारिरीक क्रिया संथ झाल्यावर मेंदूमध्ये यायला चालू होतात.यात अनेक अवास्तव गोष्टी असण्याची संभावना असते.अनेक शोध जसे DNA चा शोध हा स्वप्नात लागल्याचे आपणाला माहीत आहेच.त्यामुळे स्वप्नात एखादी व्यक्ती येणे व त्यावर उपाय म्हणून हे थोतांड करणाऱ्याची गरज आहे हा दावाचं फोल ठरतो.
आणखी दुसरी गोष्ट म्हणजे पशू-पक्ष्यांची हत्या करुन अथवा बळी देऊन पुण्य लाभते हे थोतांड आहे. मग ते बकरी ईद असो की यात्रा -जत्रा. प्राण्याचा बळी देऊन चेटकीण पिच्छा सोडते हे निव्वळ हास्यास्पद
आहे. आणि आषाढचं का ? सगळे दिवस तर सारखे असतात. स्त्रियांचा समावेश वर्ज्य करणे हा पुरुषप्रधान संस्कृती टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. यातून वर्चस्ववाद व स्त्रियांना दुय्यम लेखण्याची वृत्ती दिसून येते.
आज भारत चंद्र, मंगळावर अवकाशयान पोहोचवण्यात यशस्वी ठरला आहे. जग विज्ञानाच्या आधारे वर्तमान व भविष्य यावर रोज नवनवीन शोध लावून समृद्धतेकडे वाटचाल करत असताना भारतातील लोकांचे आदिम अंधश्रध्दांबद्दल वाढते आकर्षण विचार करु शकणाऱ्या भारतीयांसाठी चिंतेचा विषय आहे.
© -सर्वेश सवाखंडे.
©-श्रेयस सवाखंडे.
टीप: सदर लेखातील मजकूर copy paste करणे ©copyright कायद्यान्वये गुन्हा आहे. तरी कृपया सदर मजकूर कोणत्याही social media माध्यमातून viral करु नये.
चांगला लेख, याची लिंक विद्यार्थ्यांसाठी शेअर केली तर चालेल का?
उत्तर द्याहटवाSantosh, धन्यवाद! तुम्ही जरूर करा. असंच प्रेम राहू द्या!
हटवाया blog मधील लिंक share करण्यात हरकत नाही. फक्त कॉपी पेस्ट करून टाकू नये. किंवा टाकल्यास खाली लेखकाचे नाव mention करावे.
हटवा