बॅन बॅन

 

(इमेज: सर्वेश) (Credits: Taandav: IMDb, Agrima Joshua: ndtv, Munawar Faruqui: Bar and Bench, Tanishq ad: she the people, Padmavat: IMDb, My Name Is Khan: IMDb)

                 हल्ली भावना दुखावल्या गेल्यामुळे गोष्टी 'बॅन' करायची जणू फॅशनच आली आहे. कुठेतरी एखाद्या चित्रपट, वेब सिरीज, पुस्तक, कलाकृती, स्टँड-अप कॉमेडी, सटायर, जाहिराती मुळे धर्माच्या, राजकीय नेत्यांच्या, ऐतिहासिक व्यक्तींच्या, जातींच्या, परंपरांच्या बद्दल काही टिप्पणी किंवा काही लोकांना प्रतिकूल अशा गोष्टी आढळल्या (किंवा आता आढळल्या नाही तरीही) लोकांच्या भावना दुखावल्या जातात. आजकाल तर याची तीव्रता भयावह वाटावी इतकी वाढली आहे.

         नजीकच्या काळात अशा घटना जणू रोजच्याच झाल्यात. उदा.तांडव या वेब सिरीज वर बंदी घालण्याची भाजपा नेते राम कदम यांची मागणी, इंदोर मधील भाजपा नेत्या मालिनी गौड यांचा मुलगा एकलव्य गौड याने शो मध्ये घुसून स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकी, नवीन यादव, प्रखर व्यास, प्रियम व्यास, एडविन अँथनी, सदाकत खान यांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देणे, स्टँड अप कॉमेडियन अग्रीमा जोशुआने विडिओ अपलोड केल्यानंतर तिला अनेकांनी दिलेल्या बलात्काराच्या धमक्या आणि हॅबीटॅट स्टुडिओ मध्ये झालेली तोडफोड इ अनेक गोष्टी नजीकच्या काळात घडल्या आहेत.

                 या गोष्टी या पूर्वी सुद्धा घडल्या आहेत. माय नेम इज खान, पद्मावत, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, इ. चित्रपट, हे राम नथुराम सारखी नाटके, तनिष्क, सर्फ एक्सल इ. जाहिराती याच्या शिकार ठरल्या आहेत. 

                  

'मॉब जस्टीस' ही न्यू इंडिया मधील न्यायाची पद्धत आहे. (Credits:DNA india)

                        न्याय, कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टींवर जास्त विश्वास न ठेवता ' मॉब मेंटेलिटी' वर विश्वास ठेवणारे लोक तयार झाले आहेत. राजकीय पक्ष या आगीला हवा द्यायचं काम करताहेत. जमाव एखाद्या गोष्टीचा न्याय उत्तमरीत्या करू शकतो अशा खोट्या गृहितकाचा हा परिणाम आहे. एखादी गोष्ट धर्म, जात, परंपरा, संस्कृती इ. च्या विरोधात आहे हे सांगितल्यावर त्याची शहानिशा न करता जमाव तोडफोड, दंगे, बंदी आणण्याचा काहीही विचार न करता प्रयत्न करतो.

                    याचं खूप चांगलं उदाहरण मुनावर फारुकीचं आहे. युट्युब वरील ४ वर्षांपूर्वीच्या व्हिडिओ वरून एकलव्य गौर आणि हिंद रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शो मध्ये घुसून शो बंद पाडला, ऑडियन्स ला बाहेर काढलं, मुनावर फारुकी शांतपणे सांगत असताना न ऐकता मुनावर आणि इतर पाच जणांना धक्काबुक्की आणि मारहाण केली आणि मुनावर आणि इतर पाच जणांवर IPC Section 295 A (धार्मिक भावना भडकावणे) आणि 269 (बेकायदेशीर किंवा निष्काळजी कृत्यामुळे जीवघेण्या आजाराचे संक्रमण होणे) लावून FIR दाखल केली.

                        त्यानंतर तुकोगंज पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी कोर्टात सांगितले की व्हिडिओ वरून धार्मिक भावना भडकवल्याचे कुठेही सिद्ध होत नाही.मात्र कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल हे कारण सांगून अटक वाढवली आणि जामीन नाकारला गेला. अटक केलेल्या ६ जणांपैकी १ जण मुनावर फारुकी चा इव्हेंट मॅनेजर आहे. त्याचा केसशी काहीही संबंध नाही. २ स्टँडअप कॉमेडियन आहेत मात्र त्यांनी स्वतःचा सेट सादर केला नव्हता. एक मुनावरचा मित्र आहे जो प्रेक्षकांत बसलेला होता. १ ऑर्गनायजर आहे. ५ जणांचा केसशी संबंध नाही. मुनावरच्या व्हिडिओ वरून धार्मिक भावना भडकवल्याचे सिद्ध होत नाही. तरीही सर्वजण अजून तुरुंगात आहेत.

(Credits:FFRF.ORG)


                       पाकिस्तानमध्ये पास झालेल्या ब्लास्फेमी कायद्याचे section सुध्दा २९५ A आहे. इंग्रजांनी आणलेल्या या दोन्ही कायद्याचे section भारत आणि पाकिस्तान मध्ये एकच आहेत. पाकिस्तान मधील कट्टर धार्मिक निंदविरोधी कायद्याचा वापर विरोध करणाऱ्या लोकांची तोंडे बंद करण्यासाठी केला जातो. प्रत्येक मुद्यावर पाकिस्तानचा द्वेष करतो असे दाखवणारे मोदी सरकार आणि भारतही त्याच पातळीवर पोहोचला आहे. 

                       राजकीय पक्षांसाठी अशा कायद्यांचा वापर करून लोकांचा आवाज दाबणे सोपं झालं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा जो जमाव आहे, त्याला लीड करणारे राजकीय नेते, त्यांचे नातलग सोडले तर इतर सर्वजण याचं व्यवस्थेचे बळी आहेत. 

                        त्यातील बहुतेक जण बेरोजगार, ब्रेनवॉश केलेले तरुण आहेत ज्यांच्या बाबतीत ते आता जे करत आहेत तेच घडणार आहे. व्यवस्थेच्या, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा आवाज दाबला जाणार हे सत्य आहे. जमावाला चेहरा नसतो. जमावाला अटक करता येत नाही मात्र मोठ्या राजकीय नेत्यांच्या अंगाशी आलं की अटक होणारे सर्व जण जमावातलेचं असतात. दंगलीत मरणारेही तेचं असतात आणि नेता जिंकावा म्हणून जमिनीवर कष्ट करणारेही तेचं असतात. राजकीय नेते आणि नातलग नेहमी सुखरूप असतात.

लेखक, कलावंत आणि सर्जनशील लोक लोकांच्या संवेदनशीलता वाढवू शकतात. (Credits: The New York Times)

                         प्रत्येक लेखक, कलावंत, satirist, standup comics चं काम लोकांच्या संवेदनशीलतेच्या मर्यादा वाढवून त्यांना व्यापक विचार करायला लावणे हे असते. हे काम जितक्या प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केलं जाईल तितक्या लोकांच्या विचारांच्या मर्यादा वाढत जातील. आणि हे प्रगत समाजाचे लक्षण आहे. 

                           जगामध्ये धर्म हा विषय लोकांच्या प्रखर संवेदनशीलतेचा विषय बनला आहे. भारतात त्याने अजूनचं प्रखर रूप धारण केले आहे. भारतात आता धर्म आणि देवाची जागा राजकीय नेत्यांनी घेतली आहे. धर्म आणि देव यांच्या संवेदनशीलतेबाबत प्रबोधन करणे आता हाताबाहेर गेले आहे. आता नंबर आहे राजकीय नेते आणि पुढाऱ्यांचा.

अराजकता पसरणे सत्ताधाऱ्यांसाठी नेहमी फायद्याचे असते.(Credits: iStock)


                          त्यापुढचा नंबर कदाचित जातींचा असेल. एकवेळ अशी येईल जेव्हा हे सर्व सुधारणांच्या पलीकडे जाऊन अराजकता माजेल. त्यासाठीच सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, विद्यार्थी, युवा आणि सर्व लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अराजकता माजणे सत्तेवर असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. म्हणूनच वेळ जाण्यापूर्वी जागे होणे गरजेचे आहे.

                                        लेखन, इमेज: सर्वेश 

टिप्पण्या

Trending

आयुष्य

वैज्ञानिक दृष्टिकोन

मुक्त ती