शेतकरी जात्यात ,आपण सुपात, अदानी- अंबानी तुपात
![]() |
| शेतकऱ्यांनी तीन कृषी बिलांविरोधात दिल्लीकडे कूच केली. (Credits: NEWSCLICK) |
गेल्या दोन महिन्यांपासून पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विषयक कायद्याला विरोध करत आहेत. दोन अडीच महिने झाले शेतकरी आम्हाला हे नवे कायदे नको आहेत असे ओरडून सांगत होते. परंतु शेतकऱ्यांचा हा आवाज ना सरकारपर्यंत पोहोचत होता, ना सरकार पुरस्कृत मीडिया पर्यंत पोहोचत होता. ज्यावेळी या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली तेंव्हा मात्र सरकारच्या आणि गोदी मीडियाच्या कानठळ्या बसायला लागल्या आणि सरकार खडबडून जागे झाले. न्यूज चॅनेल मधून गेले पाच दिवस झाले आपल्याला शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बातम्या दिसू लागल्या खऱ्या परंतु हे आंदोलन काही काल परवा सुरू झालेले नाही. गेले शंभर दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे.
5 जून 2020 रोजी मोदी सरकारने कृषी बाजार सुधाराचे अध्यादेश काढले होते. हे अध्यादेश काढताना लोकसभेत कुठलीही चर्चा न करता हाती असलेल्या पाशवी बहुमताच्या आधारे हे अध्यादेश मोदी सरकारने पारित केले. राज्यसभेत देखील यावर कुठलीही चर्चा होऊ दिली नाही आणि केवळ आवाजी मतदानाने हे अध्यादेश मंजूर करून घेतले. मुळात कोणताही नवीन कायदा आणताना त्यावर लोकांची मतमतांतरे केंद्र सरकारकडून मागितली जातात.आपण करत असलेला कायदा कोणत्या घटकावर परिणाम करणार आहे किमान त्या घटकाची मते तरी जाणून घेतली जातात. समाजातला बुद्धिजीवी गट यात आपापली मते मांडतो. या मतांचा विचार करून सरकार नवीन कायद्याचा मसुदा बनवत असते. कृषी विषयक कायद्यांच्या बाबतीत सरकारने कोणत्याही संसदीय परंपरेचे पालन न करता मनमानी पध्दतीने हे कायदे केले आहेत.
लोकसभेत आणि राज्यसभेत हे कृषी विषयक अध्यादेश पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींची सही होऊन कायदा पारित होईपर्यंत त्यातील तरतुदींची आणि संभाव्य परिणामांची चर्चा शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये हळूहळू होऊ लागली होती. सर्वात प्रथम पंजाब आणि हरियाणातील शेतमाल बाजारातील किमान हमी दराने होणाऱ्या खरेदीच्या भवितव्याबद्दल शंका निर्माण झाल्याने तेथील शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीला अस्वस्थता पसरली आणि लोकं रस्त्यावर येऊ लागले.
शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर तेंव्हाच सरकारने त्यांच्या शंकेचे निरसन करायला हवे होते.परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. शंकेचे निरसन न झाल्यामुळे मोर्चे, रास्तारोको, रेल रोको,ट्रॅक्टर रॅल्या यातून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली. सुरुवातीलाच सरकारने या आंदोलनाकडे राजकीय आंदोलन म्हणून सहेतुक दुर्लक्ष केले. खरे पाहता शेतकऱ्यांच्या या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाचा हात नव्हता. शेतकरी संघटनेचे लोक अतिशय संसदीय पद्धतीने आपल्या न्याय मागण्या सरकारपुढे ठेवत होते.
![]() |
| मीडियाने शेतकरी आंदोलनाला दुर्लक्षित केले. (Credits: Gulf News/cartoon by: Satish Acharya) |
शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या न्याय मागण्या मांडत असताना सरकार मात्र सुशांत सिंग, रिया, कंगना आणि अर्णव गोस्वामी सारख्या फालतू प्रकरणावर लक्ष ठेवण्यात गुंतले होते. शांत मार्गाने आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणा मधील शेतकऱ्यांचा संयम तुटत चालला होता परंतु सरकारने त्यांची बिलकुल दखल घेतली नाही. म्हणूनच पंजाब-हरियाणा मध्ये आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी चलो दिल्ली चा नारा दिला. आपण आणलेल्या कृषी कायद्यावर लाखो शेतकरी नाराज आहेत याची कल्पना खरे म्हणजे केंद्र सरकारला तेंव्हाच यायला हवी होती परंतु,अहंकारी केंद्र सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केले. केंद्र सरकार आपले गाऱ्हाणे ऐकत नाही म्हंटल्यावर शेतकऱ्यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्यावर भर दिला. पंजाब हरियाणा मधील शेतकरी कुटुंबातील तीन-तीन पिढ्या आपल्या ट्रॅक्टर सहित सहा महिने पुरेल एवढा शिधा घेऊन दिल्लीकडे कूच करत निघाल्या.
हे आंदोलक शेतकरी अतिशय संयमाने आणि घटनेने दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून दिल्लीकडे मार्गक्रमण करत होते. परंतु सरकारने रस्ते खोदून, लाठीमार करून, अवजड वाहने रस्त्यात उभेकरून,अश्रूधुराच्या नळ्या फोडून, भर थंडीत अबालवृद्धांवर पाण्याचा मारा करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. तरीही शेतकऱ्यांनी आपला संयम न ढळू देता शांतपणे हे आंदोलन सुरूच ठेवले. दिल्लीची चहुबाजूंनी नाकेबंदी होत आहे हे समजल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी तयारी दर्शवली.
सुरुवातीला बऱ्याच अटी आणि शर्थी ठेऊन सरकारने चर्चेची तारीख विनाकारण लांबवली. दोन-तीन दिवस झाले सरकारकडून चर्चा होतीय परंतु अजूनही कुठलाच तोडगा निघत नाही. सुरुवातीला सरकारने या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बिलकुल दखल घेतली नाही पण शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत याची जाणीव झाल्यावर कधीही तोंड न उघडणारे पंतप्रधान बोलू लागले आणि कधीच कोणाचं न ऐकणारे अमित शहा ऐकू लागले यावरूनच या आंदोलनाची ताकत दिसून येते.मुळात ही कृषी विधेयक नेमकी आहेत काय आणि यातील कुठल्या मुद्द्यांवर शेतकरी नाराज आहेत हे पाहणे आवश्यक आहे.
मोदी सरकारने तीन विधेयके आणली होती.
![]() |
| कृषी उत्पादन आणि वाणिज्य विधेयक |
| १) कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) विधेयक - |
या विधेयकाचा मुख्य उद्देश म्हणजे 'वन नेशन वन मार्केट' प्रणाली आणणे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 50 च्या दशकात भारतीय शेतकरी खाजगी सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात अडकला होता. खाजगी सावकार त्यावेळी कर्जाचे व्याज म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालावर डल्ला मारत होता. शिवाय शेतमाल विकण्यासाठी बाजार प्रणाली नसल्यामुळे शेतमाल मिळेल त्या किंमतीला तो देऊन टाकायचा. यावर उपाय म्हणून त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती नामक बाजार प्रणाली सरकारने आणली. ज्यामध्ये एका एजंट मार्फत (आडत्या) शेतकरी आपला कृषीमाल बोली लावून विकू लागला. जो जास्त बोली लावेल त्याला तो माल विकला जाऊ लागला. एजंट लोकांना यातून कमिशन मिळायचे तर झालेल्या एकूण व्यवहारातून राज्य सरकारलाही कराच्या रुपात काही रक्कम मिळायची. गेली साठ वर्षे झाली ही व्यवस्था भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत उत्तम प्रकारे सुरू आहे.
मोदी सरकारने आणलेल्या नवीन कायद्यात देखील ही व्यवस्था आहे परंतु ती पुढे टिकेल की नाही ही शंका आहे. नवीन कायद्या नुसार आता शेतकरी आपला कृषीमाल अगोदर प्रमाणेच बाजार समितीत कमिशन एजंट मार्फत विकू शकेल.याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा एक पर्याय असेल तो म्हणजे ओपन मार्केट चा. म्हणजे कमिशन एजंट शिवाय देखील शेतकरी स्वतः व्यापाऱ्याला किंवा कंपनीला थेटपणे आपला माल हव्या त्या किंमतीला विकू शकेल. म्हणजे मधल्या आडत्याचे कमिशन शेतकऱ्याला द्यावे लागणार नाही. हे प्रथमदर्शनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे वाटते परंतु सर्व शेतकऱ्यांनी ओपन मार्केट मध्येच आपला माल विकायला सुरू केले, आणि दोन तीन वर्षात कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पडल्या तर पुढे शेतकऱ्यांसमोर ओपन मार्केट हा एकच पर्याय शिल्लक राहिल. बाजार समित्या असेपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दाम मिळू शकेल परंतु एकदा का बाजार समित्या बंद पडल्या की पुन्हा व्यापाऱ्यांची मक्तेदारी सुरू होईल. शेतकऱ्याचा माल पडेल किंमतीत मागून व्यापारी स्वतःचा फायदा पाहतील यात शंका नाही. सगळ्यात मोठी गोची म्हणजे या ओपन मार्केट मध्ये किमान हमी भावाचा कसलाच नियम लागू नसेल. म्हणजेच किमान हमी भावाची तरतूद या नवीन कायद्यात बिलकुल दिलेली नाही.
![]() |
| मूल्य आश्वासनावर आधारित किसान समझोता आणि कृषी सेवा बिल |
२) मूल्य आश्वासनावर आधारित किसान समझोता आणि कृषी सेवा बिल -
यामध्ये सरकारने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दल जोरकसपणे सांगायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव मिळेल, भारतीय शेतकरी ग्लोबल होईल अशी बरीच रंजक स्वप्ने सरकारकडून दाखवली जात असली तरी याच्या खोलात गेल्यावर मात्र वास्तव वेगळेच असल्याचे दिसते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही अशी संकल्पना आहे ज्यामध्ये एखादी कंपनी थेट शेतकऱ्यासोबत करार करून त्याच्याकडून माल घेईल.
उदा. डी मार्ट सारखी एखादी कंपनी गव्हाचा आटा तयार करते. या कंपनीला दरवर्षी हजारो क्विंटल गव्हाची गरज असते. रब्बी हंगामाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये ही कंपनी थेट शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांच्यासोबत एका ठराविक किंमतीला गहू खरेदी करण्यासाठीचा करार करेल.या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्येदेखील प्रथमदर्शनी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असेच वाटते. परंतु कोणतीही कंपनी फक्त नफ्यावर जगत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यापेक्षा ही कंपनी स्वतःचा फायदा पाहणार हे उघड आहे. पहिली दोन-तीन वर्षे कंपनीकडून शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळेल हे नक्की. परंतु सगळे शेतकरी अशा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा किंवा ओपन मार्केटचा वापर करायला लागले तर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पडतील हे वास्तव आहे. कारण या बाजार समित्यांकडे जर शेतमाल येणे बंद झाले तर सरकारला त्याचा मेंटन्सन्स परवडणार नाही. सरकारी जागा, सरकारी कर्मचारी यांचा खर्च सरकारच्या आवाक्याबाहेर गेल्यास या बाजार समित्या म्हणजे सरकारसाठी पांढरा हत्ती ठरतील. त्यामुळे या बाजार समित्या एकदा बंद पडल्या की शेतकऱ्यांकडे शेतमाल विकण्यासाठी भक्कम पर्याय उपलब्ध नसेल.
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा प्रकार सर्वच शेतकऱ्यांना उपयोगाचा आहे असेही नाही. कारण उद्या डी मार्ट सारखी कंपनी पाच-दहा क्विंटल गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यासोबत करार करणारच नाही. जो शेतकरी वीस-तीस टन गव्हाचे उत्पादन करतो अशाच शेतकऱ्यांसोबत हे करार केले जातील. यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये देखील शेतकऱ्यांना किमान हमी भावाची हमी सरकारने दिलेली नाही. सरकार कडून हमी भावा बद्दल फक्त तोंडी सांगितले जात आहे परंतु, प्रत्यक्ष कायद्यात हमी भावा बद्दल एकही ओळ दिलेली नाही. म्हणजे याठिकाणी देखील कंपनीच्याच फायद्याचा विचार सरकारने नवीन कायद्यात केलेला आहे.
![]() |
| आवश्यक वस्तू संशोधन विधेयक |
३) आवश्यक वस्तू (संशोधन) विधेयक -
आवश्यक वस्तू कायदा 1955 साली केंद्र सरकारने बनवला होता. या कायद्याचा प्रमुख उद्देश होता तो म्हणजे काळ्या बाजारावर आळा घालणे. यामध्ये आता बदल करून सरकारने फक्त युद्धाच्या किंवा कोरोना सारख्या आपत्तीच्या काळातच यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे इतर साधारण परिस्थितीत वस्तूंच्या साठवणुकीवर कोणतेच नियंत्रण असणार नाही. भारतात पूर्वी साठेबाजी करून कृत्रिम पद्धतीने किंमती कमी किंवा जास्त केल्या जात होत्या. तीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची जास्त शक्यता आहे. आता एखादा व्यापारी त्याला हवा तेवढा शेतमाल साठवू शकतो. शेतकऱ्यांकडे शेतमाल साठवण्यासाठी पुरेशी सुविधा नसते त्यामुळे या कायद्याचा खरा लाभार्थी पुन्हा व्यापारीच असणार आहे. शिवाय यामुळे कांद्यासारख्या कृषीमालाच्या किंमती कृत्रिमरित्या कमी जास्त करण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठी संधी मिळेल अशीही भीती आहेच. एकूणच सरकार एकीकडे म्हणते शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दलाल काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची दुसरीच व्यवस्था उभी करत आहे.
या तिन्ही कायद्यावर आणि त्यातील बऱ्याच मुद्द्यांवर शेतकऱ्यांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. हे तिन्ही कायदे उद्योगपती आणि व्यापाऱ्यांच्या फायद्याचे आहेत हा त्यातील एक मुख्य आरोप आहे. सध्या देशात किमान आधारभूत किंमतीचा फायदा फक्त 6 टक्के शेतकऱ्यांना होतो असे सरकारी आकडेवारी सांगते. म्हणजे आजही किमान आधारभूत किंमतीपासून शेतकरी कोसो दूर आहे. एकीकडे मोदी सरकार म्हणते 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे तर दुसरीकडे शेतकऱ्यालाच खड्ड्यात घालणारे कायदे करते.
![]() |
| दिल्ली मध्ये निषेध करणारे शेतकरी (credits: NDTV) |
60 च्या दशकात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समित्या कायमच्या बंद करण्यापेक्षा त्यांच्यात कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे, ते सरकारने करायला हवेत.या बाजार समित्यांमुळेच शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली शिवाय सरकारलाही या व्यवस्थेतून कर स्वरूपात काही रक्कम मिळत गेली. आज देशात 7 हजार कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत. 2006 मध्ये बिहार राज्यात या बाजार समित्या बंद करण्याचा घाट तेथील राज्य सरकारने घातला होता. तेथील बाजार समित्या बंद पडल्यानंतर तेथील अल्पभूधारक असणारे लाखो शेतकरी शेती सोडून दुसऱ्या काम धंद्याला लागले. आपल्याकडे असणाऱ्या एखाद्या बिहारी व्यक्तीकडे त्याच्या शेतीची चौकशी केली तर दिसून येईल की तो अल्पभूधारक शेतकरी आहे. हे फक्त बिहार या एका राज्याचे उदाहरण झाले; संपूर्ण भारतात एकूण 85% शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांचे उत्पन्न अतिशय कमी आहे. यांना ना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा फायदा होईल ना ओपन मार्केटचा.दहा-वीस क्विंटल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एकच गोष्ट जिवंत ठेऊ शकते ती म्हणजे हमी भाव.
शेतकऱ्यांना सरकारकडून एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे स्वामिनाथन आयोगाने सांगितलेली उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान हमी भावाची हमी. आणि तेच सरकार देत नाही. ओपन मार्केट किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्येही किमान आधारभूत किंमतीचा नियम सरकारने लागू करावा ही संपूर्ण आंदोलनातील एकच मागणी आहे. आणि का असू नये? शेतकरी हा जगातला एकमेव असा घटक आहे जो स्वतः पिकवलेल्या मालाची किंमत स्वतः ठरवू शकत नाही.कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये कंपनीकडे लिगल ऍडव्हायजर असतात, हे ऍडव्हायजर सर्व कायदेशीर प्रक्रिया अगदी चोख करत असतात. पण शेतकऱ्यांना अशी सोय नसते.
उद्या जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये किचकट कायदेशीर बाबींमध्ये शेतकऱ्याला कंपनीकडून अडकवले गेले तर त्याला सोडवणार कोण आणि कसे? याही प्रश्नांची उत्तरे सरकारकडून मिळत नाहीत. एकूणच शेतकऱ्यांना यात कायदेशीर संरक्षण मिळणे अवघड होईल. गुजरात आणि राजस्थान मध्ये कंपनीकडून शेतकऱ्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याची उदाहरणे घडून गेली आहेत. सरकारकडून हमी भावासंबंधी फक्त तोंडी आश्वासन दिले जात आहे परंतु प्रत्यक्ष कायद्यात त्याची तरतूद करायला सरकार अजूनही तयार नाही.
![]() |
| तीव्र थंडी आणि पावसाचा सामना करूनही शेतकरी ताकदीने निषेध करत आहेत. (Credits: the wire) |
शेतकऱ्यांच्या एकूण 35 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणारी संघटना देखील केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात आहे. 1 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने शेतकरी संघटनेशी एक बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी सरकारने या कायद्यावर विचारमंथन करण्यासाठी एक कमिटी नेमली जाईल असा प्रस्ताव ठेवला जो शेतकरी संघटनांनी सपशेल नाकारला. जर कमिटीच नेमायची होती तर हा कायदा आणण्याच्या अगोदरच का नेमली नाही असाही प्रश्न विचारला जात आहे. कालही केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेची फेरी झाली त्यातही तोडगा निघू शकला नाही.
![]() |
| निषेध करणारे शेतकरी (credits: NDTV) |
हे तिन्ही कायदे सरकारने वापस घ्यावे या एकाच मागणीवर शेतकरी अडून बसले आहेत तर कायद्यातील त्रुटी दूर करून कायदे लागू करण्यासाठी सरकार आग्रही आहे. एकूणच केंद्र सरकार सध्या तरी बॅकफूटवर गेलेले आहे. काल विज्ञान भवनात बैठक पार पडली.या बैठकी दरम्यान सरकारकडून चर्चेसाठी आलेल्या शेतकरी प्रतिनिधींना जेवणाची व्यवस्था केली होती. परंतु स्वाभिमान शेतकऱ्यांनी हे जेवण नाकारले आणि लंगर मध्ये बनवलेले जेवण त्यांनी विज्ञान भवनात खाली बसून खाल्ले. जगाचा पोशिंदा मागे हटायला तयार नाही.
बाराही महिने निसर्गाशी दोन हात करणाऱ्या बळीराजासाठी मोदी सरकारसोबत लढणे फारसे अवघड नाही. विशेष म्हणजे यावेळी ही ताकत एकजुटीची आहे. आता तर महाराष्ट्र, कर्नाटकामधूनही शेतकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीकडे कूच करत आहेत. पुढे काय होईल माहीत नाही परंतु पंजाब हरियाणातील त्या लढवय्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या लढाऊ बाण्याचा मला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अभिमान वाटतो.
लेखन: रत्नदीप कल्पना गुरुदेव सरोदे
बी एस सी ( कृषी)
कोल्हापूर
पेज एडिटिंग : सर्वेश








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा