वाळू माफिया भाग २
![]() |
| इमेज: सर्वेश |
अवैध वाळू उत्खननाविरोधात अनेक व्यक्ती महत्वपूर्ण काम करत आहेत. मात्र याची सुरुवात केलीये सुमैरा अब्दुलाली यांनी. ज्यावेळी त्यांनी ही गोष्ट अनेक ठिकाणी पाहिली त्यावेळी त्यांना या लोकांना रंगेहात पकडलं तरचं FIR नोंदवून घेऊ असं पोलिसांनी सांगितलं.
महाड येथे चाललेला अवैध वाळू उपसा जेव्हा त्यांनी पत्रकारांसोबत जाऊन शूट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. ही घटना २००४ ची. त्यांच्या प्रयत्नाने 'UNESCO' ने २०१२ नंतर वाळू उपसा ही गोष्ट पर्यावरणाच्या विरोधी आहे हे जाहीर केलं.
सुमैरा आणि इतर पर्यावरण कार्यकर्त्यांनी खुप मोठ्या प्रमाणावर 'Don't Bury The Issue Of Sand Mining' ही मोहीम राबवली. त्यातून 'डेनिस डेलेस्ट्रॅक' या फ्रेंच डायरेक्टर ने 'सँड वॉर्स' ही फिल्म बनवली. राष्ट्रीय हरित लवादाने त्यानंतर अवैध वाळू उत्खनना विरोधातील कायदे अत्यंत कठोर केले.
![]() |
| अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सुमैरा अब्दुलाली, पर्यावरण कार्यकर्ते आणि कोळी बांधव यांनी स्वतःला वाळूत गाडून घेतले. (Credits: Aawaz foundation/ wikimedia commons) |
वाळूचा उपसा करण्यासाठी नद्यांमध्ये किमान २० फुटांपर्यंत खोल जावे लागते. ज्या नद्यांमध्ये आधीच भरपूर उपसा केलाय त्या नद्यांमध्ये ४० फुटांपर्यंत. नदीमध्ये खाली अंधार असतो. एका रॉडला पकडून पायाच्या साहाय्याने वाळू कुठे आहे हे शोधत शोधत खाली जावे लागते. हातामध्ये धातूची बादली. ती भरून वर आणायची. दिवसभरात एका व्यक्तीने २०० ते २५० सूर मारायचे. एका व्यक्तीला २००० ते ५००० किलो वाळू रोज उपसावी लागते. त्यासाठी फक्त १००० रुपये मिळतात.
कोणताही ऑक्सिजन पुरवठा नाहीये की स्कुबा डायविंग किट नाही. समुद्रातून मोती शोधायला एवढं सगळं पुरवलं जातं. मात्र त्याहून अधिक मोठ्या असणाऱ्या व्यवसायात यापैकी काही नाही. यासाठी भरपूर वेळा डुबकी मारणाऱ्यांना दारू पाजली जाते. साधीच असावी ती. ब्रँडेड तर यातुन पैसे बनवणारे पितात. असो.
![]() |
| ठाणे खाडीतील अवैध वाळू उत्खनन (credit: the wire) |
![]() |
| चंद्रकांत मेघवाणी त्यांची पत्नी चंद्रकला मेघवानी यांच्यासोबत त्यांचा नदीत वाळू उपसा करताना मृत झालेला मुलगा महेश याचा फोटो हातात घेऊन बसलेले (credit: Thomson Reuters foundation) |
नदीमध्ये श्वास गुदमरून अनेकांचा मृत्यू होतो. कदाचित त्यांना किक फिल्म मधल्या नवाजुद्दीन सारखा १५ मिनिटं श्वास रोखून धरता येत नसावा. साधं विज्ञान आहे. पाण्याचा दाब हा हवेच्या दाबापेक्षा जास्त असतो.६ ते ८ मिनिटं आत श्वास रोखणे अवघड तर आहेच.
त्याचबरोबर नदी, खाडीच्या प्रचंड प्रवाहामुळे शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊन अशा श्रमिकांचे मृत्यू होतात. पाण्यात मृत्यू झाला तर मृतदेह ३-४ दिवसांनी तरंगत बाहेर येतो. जिथं जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पुरवल्या जात नाहीत, तिथं मेडिकल इन्शुरन्स स्वप्नातही येता कामा नये.
हे वरवर पाहता अपघाताच्या श्रेणीमध्ये टाकले जातात, मात्र हे गेंड्याच्या कातडीसारखे निबर झालेल्या व्यवस्थेचं अपयश(मी सर्व प्रामाणिक गेंड्यांची अशा चूकीच्या तुलनेसाठी हात जोडून माफी मागतो), स्वकेंद्रित वाळू माफियाची न मिटणारी भूक आणि आपल्यासारख्या स्वतःची घरे जळल्याशिवाय जाग न येणाऱ्या लोकांमुळे झालेले खून आहेत.
![]() |
| अवैध वाळू उत्खननाचे दुष्परिणाम |
याने फक्त एवढंच केलेलं नाहीये. निसर्गाचा आणि पर्यावरणाचा गळा आवळलाय. याचे निसर्गावर वरवर दिसणारे वाईट परिणाम म्हणजे नद्यांची खोली वाढणे, नद्यांचे प्रवाह बदलणे, थोड्याफार पावसात सुद्धा आजूबाजूच्या क्षेत्रात पाणी घुसणे, किनाऱ्यांची खोली वाढणे आणि तेथील झाडे उन्मळून पडणे, किनारी क्षेत्रात मातीची धूप होऊन किनारी शहरांत पाणी घुसणे, जैवविविधता धोक्यात येणे, जलचर आणि पक्ष्यांचे अधिवास आणि अंडी घालण्याची ठिकाणे नष्ट होणे, प्रवासी पक्षांची येण्याची ठिकाणे नष्ट होणे, जलचरांचे स्थलांतर होणे इ. आहेत.
मानवनिर्मित गोष्टींवर सुद्धा परिणाम होत आहेत. नद्यांच्या अतिउत्खननामुळे अनेक ठिकाणचे पूल पडले आहेत आणि अनेक धोकादायक बनले आहेत. नद्यांच्या बाजूची शेतांतील रोपे वाळू उत्खननातून बाहेर येणाऱ्या धुळीमुळे कुजत आहेत.
दुरगामी होणारे परिणाम खूप भयानक आहेत. नद्या आणि समुद्र खूप मोठे जलपुनर्भरण (Rain Harvesting) स्रोत आहेत. या अति वाळू उत्खननाने त्यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. यामुळे जागतिक तापमान वाढ होते. या मुळे कमी पाऊस किंवा जास्त पाऊस पडणे असे धोके उद्भवतात. हे आता फक्त भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारी पर्यंत मर्यादित राहिलेलं नाही, तर हा जगातील लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलाय.
![]() |
| बांधकाम कचरा (debris) (credit: Houston press) |
मग यावरचा उपाय काय? आता तरी चालू असलेला आणि प्रॅक्टिकल असलेला उपाय म्हणजे बांधकाम कचरा (विशेषतः Debris) क्रश करून त्यापासून काँक्रीट मिळवणे. मुंबई आणि इतरही अनेक शहरात हा बांधकाम कचरा डम्पिंग ग्राउंड वर फेकला जातो. त्याला रिसायकल करून आपण काँक्रीट मिळवू शकतो. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडा मध्ये हा उपाय वापरणं चालू आहे.
पण यामध्ये रिसायकल करण्यासाठी आणि त्या बांधकाम कचऱ्यातून योग्य गोष्टी निवडण्यासाठी वेळ, मशीन्स आणि खूप पैसा लागतो. भारतात टाटा इंडस्ट्रीजने प्लास्टिकपासून आपल्या पूर्ण प्लांट भोवती रस्ता बनवला आहे. भारतात आणि जगातही याबद्दल संशोधन चालू आहे.
वाळूचा वापर कमी करणे आता क्रूड ऑइल आणि कोळशाचा वापर कमी करण्याएवढं, एव्हाना त्यापेक्षा जास्तच महत्वाचं झालं आहे. डिमांड अनलिमिटेड कॉल सारखी अनलिमिटेड बनत चालली आहे, मात्र निसर्गाकडे सप्लाय लिमिटेड आहे. त्यामुळे आता तरी जागं व्हावं, सरकारने, लोकांनी आणि माफियांनीही. शेवटी परिणाम तर सगळ्यांवरच होणार आहे.
लेखन आणि इमेज- सर्वेश
-(समाप्त)






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा