UAPA : Explained
![]() |
| Cartoon by : Sandeep Adhwaryu (TOI) Image by: Sarvesh |
UAPA. सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला शॉर्ट फॉर्म. Unlawful Activities (Prevention) Act.
या कायद्यात नुकतीच दुरुस्ती केली गेली आणि ती दुरुस्ती लोकसभेत प्रचंड बहुमताने आणि राज्यसभेतही मंजूर झाली.
खरं तर हा कायदा 1967 चा. 30 डिसेंबर 1967 रोजी हा कायदा संमत झाला. त्यामध्ये 1969, 1972, 1986, 2004 , 2008 आणि आता म्हणजे 2019 मध्ये दुरुस्ती केली गेली. मग याची एवढी चर्चा करायची गरज काय आहे? आहे. ही दुरुस्ती चर्चा करावी अशीच आहे. आणि 'खतरनाक' सुद्धा आहे. का? पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला समजेल.
या कायद्यामध्ये पूर्वी असणाऱ्या तरतुदी म्हणजे
1) सरकार कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करू शकते.
2) बेकायदेशीर कृत्यांना जाहीर करु शकते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करु शकते.
2004 मध्ये कायद्यात केलेल्या दुरुस्त्या:-
1) दहशतवाद हा गुन्हा जाहीर करता येऊ शकतो.
2) एखाद्या संघटनेला दहशतवादी ठरवण्याची जबाबदारी सरकारकडे आली.
3) पोलीसांना विशेषाधिकार देऊन अटक झालेल्या व्यक्तीस जामीन मिळू नये अशी तजवीज.
यासाठी दुरुस्ती करण्यात आली.
मग जर यापुर्वी सुध्दा दुरूस्त्या करण्यात आल्या होत्या , तर हा कायदा 'खतरनाक' कसा?
या कायद्यात यावर्षी (2 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेत मंजूर) काही सुधारणा केल्या गेल्या, त्या म्हणजे,
1) आतापर्यंत राज्यांकडे असणारे अधिकार National Investigation Agency (NIA) कडे दिले गेले.
2) सरकारने एखाद्या व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचे अधिकार स्वतः कडे घेतले.
3) यामध्ये एखाद्या व्यक्तीला दहशतवादी पुढील कारणांमुळे ठरवण्यात येईल असे नमूद केले आहे :-
a) व्यक्ती आतंकवादी कार्यकर्ता असेल किंवा त्यात भाग घेत असेल ;
b) आतंकवादी बनण्यासाठी तयारी करत असेल किंवा मदत करत असेल ;
c) आतंकवाद्यांना आर्थिक मदत करत असेल ;
d) आतंकवादी साहित्य आणि आतंकवादी थेअरीला युवांच्यात उद्दीपित करत असेल तर.
यामधील संशयास्पद वाटणारा आणि ज्यावर विरोध करावा असा भाग म्हणजे,
1) भारतीय राज्यांकडे असणारे अधिकार NIA कडे देणे, जे भारताच्या संघराज्य पद्धतीच्या विरोधात आहे. NIA इतर सरकारी संघटनांप्रमाणे सरकारच्या इशाऱ्यावर नाचू शकते, जे या कायद्याचा सरकार राजकीय फायद्यासाठी, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी गैरवापर करेल या गोष्टीची शक्यता अजून बळकट करते.
2) सरकारने एखाद्याला दहशतवादी ठरवण्याचे सर्वाधिकार गृहमंत्रालयाकडे घेतले. पूर्वी या कायद्याखाली एखाद्याला शिक्षा करायची असल्यास त्याला अटक करून , त्याच्यावर खटला दाखल करून , पुरावे दाखवून न्यायालयाकरवी सर्व गोष्टींची शहानिशा करून एखाद्या व्यक्तीला शिक्षा देता येत होती.
जे अधिकार आता पूर्णतः गृहमंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे आहेत. गृहमंत्री ही राजकीय व्यक्ती असल्याने त्याचा राजकीय (गैर) वापर होणार यात नवल नाही. जर सरकारला बेकायदेशीर लोकांना दहशतवादी ठरवायचंय, तर ते या दुरुस्तीपूर्वीच्या तरतुदींतूनही करता येत होतं. सरकारला तसे अधिकार पूर्वीपासून आहेत. जर आरोपी असेल तर खटला करा, पुरावे असतील तर न्यायालयही त्यांना शिक्षा देईल! असाच एखादा कायदा व सुव्यवस्थेवर विश्वास ठेवणारा समाज दहशतवादाशी लढतो.
जेव्हा आरोपीलाही आपली बाजू मांडण्याची संधी असते, तेव्हा एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा होण्याची शक्यता धूसर होते. जर तो खरंच आरोपी आहे, तर न्यायालयात हे सिद्ध करून त्याला शिक्षा केली, तर न्याय ही होईल आणि याचा राजकीय दुरूपयोगही होणार नाही. याने कोणाला अडचण आहे? जर हे शक्य आहे, तर सर्व अधिकार स्वतःकडे घेऊन न्यायप्रवीण व्यवस्थेला का झुकवायचं?
खरी अडचण इथे आहे. यातून अमित शाह आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना एखादी व्यक्ती दहशतवादी आहे, याचा पुरावा नसताना, पुराव्याच्या आधारे त्या व्यक्तीवर खटला भरुन न्यायव्यवस्थेच्या आधारे त्याला शिक्षा करता येत नसेल, तरीही त्याला दहशतवादी ठरवण्याचा, तसं लेबल लावण्याचा अधिकार आहे. ज्या पध्दतीने 'फेक एन्काऊंटर' कसलाही न्यायालयीन खटला न चालवता व्यक्तीला मृत्युदंड देण्याचा जालीम उपाय आहे, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर खटला न चालवता त्याला दहशतवादी ठरवून त्याचं आयुष्य बरबाद करण्यासाठी, राजकीय स्वार्थापायी कायद्याचा दुरूपयोग करून स्वतःची एकाधिकारशाही सेट करण्यासाठी या कायद्याचा वापर जरूर केला जाईल.आरोपी त्याचं सर्वस्व गमवावून बसेल.
तुम्ही या विरोधात अपील करू शकता, मात्र तुमचं अपील review करणारे, सरकारच्याच हातातले आहेत. यामधून न्यायालयांना वगळण्यात आलं आहे. सरकारचा आणि सत्तेत असणाऱ्या पार्टीचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे का? या कायद्यावरून तर तो ज्यावेळी स्वतःला फायदेशीर असेल तेव्हाच आहे असं दिसतंय.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यावर लक्ष केंद्रित करायला हवं , तो आहे 'terrorist Literature and terrorist theory'. अमित शहांनी लोकसभेत म्हणलंय,
" Guns do not give rise to Terrorism, the root of terrorism is the 'propoganda' that is done to spread it, the frenzy that is spread."
पण याचा अर्थ काय? कोणतं साहित्य? ज्यापध्दतीने पोलीस आणि सिक्युरिटीजचा भारतामध्ये गैरवापर करण्यात आलाय, त्यावरून हे सर्व सरळ सरळ राजकीय विरोधकांच्या दांड्या उडवण्यासाठी, त्यांना नामोहरम करण्यासाठी आहे हे स्पष्ट आहे. खरंच सरकारला घरात 'Communist Manifesto' किंवा 'माओ त्से तुंग ' चं लहान 'रेड बुक' आणि साम्यवादाची पुस्तकं असल्यास अटक करण्याचा अधिकार असावा?
याची अनेक उदाहरणे आहेत. झारखंडमध्ये हजारो आदिवासींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करण्यात आले. का? तर ते 'पत्थल गढी' चळवळीला पाठींबा देत होते. ती चळवळ असं कोणतं 'देशद्रोही' काम करत होतीे? तर ती चळवळ संविधानाने आदिवासींना दिलेल्या विशेष अधिकारांच्या रक्षणासाठी काम करत होती. हे काम देशविरोधी आहे?
आधीचा UAPA सुद्धा कसा वापरलाय ते पाहू. मागच्या वर्षी मानवी हक्क कार्यकर्ती 'सुधा भारद्वाज ' यांच्या विरोधात तो वापरला गेला. सुधा यांनी आपलं अवघं आयुष्य न्यायालयात महिला , कामगार, शोषित वर्ग आणि आदिवासींच्या अधिकार रक्षणासाठी घालवलं. त्यांना अटक करण्यात आली. एक वर्ष जामीनाविना त्यांनी तुरुंगात घालवलं.
सुरेंद्र गडलिंग, वरवरा राव, गौतम नवलखा, शुमा सेन, रोना विल्सन, महेश राऊत आणि सुरेश ढवळे यांच्या विरोधात भिमा कोरेगाव केस मध्ये वापरण्यात आलेल्या UAPA कायद्यावरून हा कायदा अनियंत्रित सत्ताधाऱ्यांच्या हाताखाली किती भयानक पणे स्वतः च्या अनियंत्रित सत्तेला टिकवण्यासाठी मार्गातील काटे काढण्यासाठी हा मूळ कायदा वापरण्यात आला आहे, ते दिसून येतं.
2004 मध्ये मनमोहन सिंग सरकारने हा कायदा कोणत्याही संसदीय समितीकडे फेरतपासणीसाठी न पाठवता या कायद्यातील दुरुस्ती विधेयक संमत करून घेतलं. आणि त्यांना नावं ठेवणारं नरेंद्र मोदी सरकार 2019 ची दुरुस्ती करून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहे.
नवा कायदा राज्यांना या बाबतीत अनियंत्रित बनवणारी ताकद देत आहे. ही ताकद ज्यांचा हातात जाणार आहे त्यांचा इतिहास पहा, हा कायदा कोणत्या महत्त्वकांक्षेतून बनवला गेला आहे, आणि त्याचा कसा गैरवापर केला जाणार आहे हे त्यातूनच समजते. हा अत्याचारी कायदा सत्तेसाठी काहीही करण्याची अमर्याद ताकद देणारा कायदा आहे. तुम्ही या निर्णयावर आणि सरकारवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला शुभेच्छा! आणि जर विश्वास ठेवत नसाल तर ही दुरुस्ती तुमच्यासाठी 'भयानक' आहे. ही दुरुस्ती कायद्याचा गैरवापर करण्यासाठीच केलेली आहे हे थोडं डोकं चालवलं तरी समजेल. या कायदा दुरुस्तीतुन मोदी सरकारचा 'कायदा आणि सुव्यवस्थेवर' भरवसा नाही हेच प्रतीत होतं.
लेखन आणि Image - सर्वेश

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा