Opinion: राष्ट्रभक्ती
![]() |
| Cartoon via: www.otherwords.org Image by : Sarvesh |
आता यात दोन शब्द आहेत. राष्ट्र आणि 'भक्ती'. भक्ती अवतरण शब्दात देण्याचं काही विशेष कारण आहे. भक्ती आणि विश्वास या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. वरवर पाहता विश्वास हा त्या गोष्टींवर असतो ज्या गोष्टी सिद्ध झालेल्या असतात. आणि भक्ती त्या गोष्टींवर असते ज्या गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत, मात्र तरीही 'मानसिक' समजूत म्हणून मानणे.या केसमध्ये वास्तववादी गोष्टींवर ठेवला जाणारा तो विश्वास. म्हणजे छाननी करून. आणि या केसमध्ये भक्ती ही वास्तवाचं भान न ठेवता आभासी वातावरणात जगणे असा होईल.
म्हणजे राष्ट्रभक्ती ही ते आभासी जगणं आहे ज्यात आपल्या राष्ट्राच्या प्रतीकांचा गर्व बाळगून 'आम्हीच श्रेष्ठ' आणि 'विश्वगुरु' असल्याचा 'जाज्वल्य अभिमान' बाळगणे होय. देशातील गोष्टींचा, देशाने केलेल्या गोष्टींचा 'अभिमान' वाटणे योग्य आहे; मात्र याचा अर्थ नेहमी एखादा शत्रू ठेवून आपण कसे त्यापेक्षा वरचढ आहोत हे नाही.
उदाहरण घ्यायचं तर इस्रोचं घेता येईल. त्या शास्त्रज्ञांनी या काळात जे करून दाखवलं, ते कुणाला नीचा दाखवण्यासाठी किंवा काल्पनिक शत्रू बनवून केलं असतं, तर अमेरिका आणि रशिया सारखं याने केलं तर आपणही करायचं या नादात खूप प्रयोग चुकले असते. आणि आजवर आम्ही यावर किती पैसे खर्च करतोय याचेच दिखावे होत असते. अगदी शीतयुद्धाच्या काळाप्रमाणे युरी गागारीन ला पाठवलं की अमेरिकेने केल्यासारखी हतबलता भारताची झाली असती. मात्र इस्रो आज स्वतःच एक आदर्श म्हणून जगासमोर उभं आहे त्याचं खूप मोठं कारण आपण 'मे बडा' का 'तू बडा' या नादात पडलो नाही, त्यामुळे इतक्या कमी काळात आपण 'right track' वर आलो.
देश कितीही काहीही झालं, तरी ज्या मणक्याच्या आधारे उभा असतो, तो आहे अर्थव्यवस्था. ती तरी प्रतिकांचं गुणगान केलं, घोषणा दिल्या म्हणजे म्हणजे सुधारत नाही. आम्ही देशाच्या अस्मितेला आणि इतिहासाला कुरवाळत राहिलो, तर फार तर ज्या लोकांनी देशासाठी आयुष्य घालवलं, त्यांचे पुतळे होतात बाकीचं काही नाही. आणि अर्थव्यवस्थेला किंवा उद्योगपतींना देशभक्तीची भाषणे देऊन अर्थव्यवस्था किंवा उद्योगांची स्थिती सुधारतं नाही. कारण अर्थव्यवस्था मतदारांप्रमाणे वजनदार भाषणांनी हुरळून जात नाही.
देश जो नागरिकांनी बनतो, त्यांची आरोग्यव्यवस्था ही सुद्धा या आभासी जगामुळे सुधारत नाही. Oxygen च्या अभावी, आणि टाळता येण्यासारख्या आजारांनी लहान मुले, इतर वयाचे नागरिक सुद्धा मरतात. नद्या तशाच अस्वच्छ राहतात, बिल्डर लॉबीच्या अतिक्रमणाने आणि वृक्षतोडीने जास्त पाऊस झाला की महापूर येतात आणि सर्व वाहून घेऊन जातात. भूकमारीने लोक मरतंच असतात. 'ग्लोबल हंगर इंडेक्स' मध्ये मग खालून जगजेत्तेपद मिळवावं लागतं.
नागरिकांच्या इतर मूलभूत समस्याही तशाच राहतात. फक्त या आभासी जगात या मूलभूत समस्यांचा दुर्गंध येत नाही. राष्ट्रभक्ती त्यावरील अत्तरासारखे काम करते, मात्र त्याने समस्या काही दूर होत नाहीत. त्या दूर करण्यासाठी त्या मान्य करून अगदी प्राथमिक पातळीपासून कामाची सुरुवात करावी लागते. आणि त्याचा अभाव आपल्या बहुतेक साहेब, राजे, दादा आणि क्वचित असणाऱ्या ताईंत दिसतो.
या संज्ञेचा वापर जिथे ठळक पद्धतीने होतो, तिथे म्हणजे संरक्षण आणि क्रीडा क्षेत्रात. मात्र अगदी संरक्षण क्षेत्रातही या आभासी जगाचा वापर होत नाही. उलट परराष्ट्र व्यवहारातील निवडणुका जिंकण्याच्या इराद्याने घेतलेल्या निर्णयांनी आणि सुमार कामगिरीने शेजारी आणि इतर देशांशी संबंध बिघडतात, आणि असे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेच्या गॅस वरचं आपला अवघा स्वयंपाक करणारे राष्ट्रीय लिडर जास्त प्रमाणात सैनिकांच्या आणि सरहद्दींवर असणाऱ्या ठिकाणांवर राहणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचे कारण बनतो. अगदी महायुद्ध ही पाहिली तरी तोच जिंकतो, ज्याचं नियोजन, तंत्रज्ञान दुसऱ्या पक्षापेक्षा वरचढ असतं.
क्रीडा क्षेत्रात ही तेच आहे. ज्याची जास्त राष्ट्रभक्ती असेल तोच जिंकतो, असं काही होत नाही. त्या दिवशी असणाऱ्या तणावात, असणाऱ्या परिस्थितीत जो खेळाडू किंवा संघ दुसऱ्या संघापेक्षा किंवा खेळाडू पेक्षा उत्तम करतो तो जिंकतो. उलट एखादा खेळाडू जर राष्ट्रभक्तीच्या जास्तच प्रभावाखाली आला तर तो तणावग्रस्त होऊन चूका आणि आक्रस्ताळेपणा करून ज्या गोष्टी तो शांत राहून करू शकला असता, त्या सुद्धा करू शकत नाही.
राष्ट्रभक्ती हे मृगजळ आहे. या मृगजळाला दाखवून फक्त दाखवणाऱ्या राजकारण्यांचा फायदा होतो. आणि त्याला भुलणाऱ्यांची कस्तुरीमृग या वि.स.खांडेकर यांच्या कथेतील हरणासारखी अवस्था होते. भ्रष्टाचाराने बरबटलेले, बलात्कार, खून, दंगली भडकवणे असे आरोप असलेले, देशाला लुटणारे आणि नागरिकांना महामुर्ख बनवणारे लोक देशाबद्दल प्रेम कसं करावं हे शिकवतात. शेवटी देशावर प्रेम असणं म्हणजे फक्त सीमेवर जाऊन बंदूक, रणगाडे ,विमाने, पाणबुड्या,जहाजे घेऊन लढणे नव्हे. तर देशाचे कायदे पाळणे, नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे, आणि स्वतः करत असलेलं काम प्रामाणिकपणे करणं हे आहे.
लेखन आणि इमेज : सर्वेश

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा