इराण आणि त्याचे धर्मराज्य



                               Image credits:- Sarvesh
             
            भारतामध्ये धर्माच्या आधारावर राष्ट्रनिर्मिती करण्याचा विचार राजकीय क्षितिजावर उदयास येत आहे. त्यामुळे धार्मिक विचारधारेचा देशाच्या व्यवस्थेवर होणारा परिणाम पाहणे क्रमप्राप्त आहे. धार्मिक विचारधारेच्या आधारे चालणार्‍या देशांमध्ये होणार्‍या परिणामांचा आढावा आपण खालील मुद्द्यांच्या आधारे करूया. आपण इराण या देशाचा आढावा घेऊयात.

1] स्वातंत्र्य/ सत्तापद्धती बदल :- 
                  इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ची स्थापना १९७९ रोजी इराणीयन क्रांतीने झाली. त्यापूर्वी १९२५ ते १९७९ पहलवी घराण्याची सत्ता होती. ज्यामध्ये रेझा शाह पहलवी यांची सत्ता १९४१ पर्यंत होती. ती सत्ता अँग्लो-सोवियत आक्रमणांनंतर त्यांना पदत्याग करून सोडावी लागली. त्यानंतर त्यांचे पुत्र मोहम्मद रेझा शाह पहलवी यांनी १९७९ पर्यंत सत्ता चालवली. त्यापूर्वी क्युजर घराण्याची सत्ता होती. इराणीयन क्रांती जनतेच्या प्रदर्शने, हरताळ, प्रतिकार यांनी अंमलात आली. या क्रांतीलढ्याचे नेतृत्व आयातुल्लाह रूहोलाह खोमेणी यांनी केली. जे नंतर इराणचे पहिले सुप्रीम लीडर बनले. 

2]आताची सत्तापद्धती:- 
                  इराणी जनमत चाचण्यांनी इराणचे संविधान हे लोकशाही आणि धर्मगुरूसत्ताक राज्यपद्धती यांचे मिश्रण असेल असा कौल दिला. इराणी  व्यवस्थेमध्ये दोन संस्था आहेत. एक लोकांनी निवडलेल्या आणि दुसर्‍या प्रतिनिधींनी निवडलेल्या. मजलीस (संसद),असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्ट्स,राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडलेले असतात. मजलीसची सदस्यसंख्या २९० आहे. निवडून आलेले संसद सदस्य मंत्रिमंडळ व गार्डियन कौन्सिल (जे मंत्रीमंडळाने केलेल्या कायद्यांवर निगराणी ठेवते.) यांची निवड करतात. गार्डियन कौन्सिल हे वरिष्ठ सभागृह आहे. तसेच असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्ट्स सुप्रीम लिडरला निवडते. न्यायसंस्था, सैन्य, एक्सपेंडेन्सी कौन्सिल हे या संस्थांकडून निवडले जातात.

3] एकाधिकारशाही चे परिणाम होणारे घटक :-

अ) निवडणूक पद्धती:-
                       इराणी निवडणूक दर चार वर्षांनी होते. मजलीस आणि
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूका वेगवेगळ्या कालावधीत होतात. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था जसे शहरी व ग्रामीण कौन्सिलच्या निवडणुका ही दर चार वर्षांनी होतात. असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्ट्सच्या निवडणुका दर आठ वर्षांनी होतात. मतदाराचे किमान वय १८ वर्षे आहे. तसेच मतदारसंघ सिंगल सीट व मल्टी सीट आहेत.

ब) मीडिया :-
           ‘ONE OF THE MOST OPPRESSIVE COUNTRY’ अशी ‘REPORTERS WITHOUT BORDERS’ च्या ‘WORLD PRESS FREEDOM INDEX’ च्या रिपोर्ट मध्ये आलेली हेड लाइन बरंच काही बोलून जाते. २०१९ च्या RANKING मध्ये इराण १८० देशांमध्ये १७० व्या स्थानावर आहे. १७० व्या स्थानामुळे इराण ‘अत्यंत गंभीर परिस्थिती’ मध्ये आहे. याला कारणीभूत असणार्‍या अनेक गोष्टी आहेत. १९७९ पासून जवळपास ८६० पत्रकार  आणि नागरिक पत्रकारांना अटक झाली आहे. धार्मिक कट्टरतावाद धर्मावर आधारित सरकारच्या काहीही बोलण्याच्या विरोधात आहे. यातून सरकारच्या विरोधात बोलणार्‍या पत्रकारांना धमक्या, खोटी कलमे लावून अटक अशा अनेक गोष्टी सातत्याने घडतायत. यातून अनेक पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत.

क)   व्यक्तिस्वातंत्र्य :-
                  इराण मध्ये १९७९ साली जी इराणीयन क्रांती आली तेव्हापासून देशामधील कायदे हे शरिया या इस्लाम मधील कायद्यांनुसार बनवले असल्याने लोक हे त्या कायद्यांच्या चौकटीत आहेत. धर्माशी विसंगत असणारे अधिकार त्यामुळे लोकांना मिळत नाहीत. पत्रकार व नागरिक पत्रकारांना अटक होत आहे. इराण – इराक या युद्धामध्ये लहान मुलांचा समावेश केला गेला.  

ड) धर्माचा सरकारमध्ये हस्तक्षेप:-
1) इराणीयन संविधान धर्माधिष्ठित लोकशाही आहे.
2)इराणीयन राज्यक्रांतीने शिया इस्लाम देशाच्या राजकीय ढाच्याचा एक भाग बनवला.
3)त्यानंतर एका नवीन राजकीय सरकारी पद्धतीचा उदय झाला. जे इस्लामिक ज्यूरिस्टकडून (सुप्रीम लीडर)चालवले जाईल. तसेच सरकार शरिया कायद्यांनुसार चालेल. ज्यावर इस्लामिक ज्यूरिस्टचे लक्ष्य असेल.
4)इराणी राज्यक्रांतीचा मूळ हेतू हा इराणी समाजाची इस्लामी विचारसरणी असलेला देश म्हणून असणारी ओळख पुनरुज्जीवित करणे हा होता. इराणी राजकीय व्यवस्था पाश्च्यात्य पद्धतीची आहे, परंतू त्यामध्ये धर्माचा हस्तक्षेप आहे.

ई) जागतिक शांततेवर होणारा परिणाम :- 
                                  जगाच्या इतिहासामध्ये इराण-इराक युद्ध हे अनेक माणुसकीला काळीमा फासणार्‍या कृत्यांपैकी एक आहे. इराकने केलेल्या हल्ल्यामुळे सप्टेंबर २२, १९८० रोजी युद्ध चालू झालं. या युद्धाचं कारण इराकला इराणचा १९७९ च्या इराणीयन क्रांती नंतर ‘Persian Gulf State’ मध्ये वाढत जाणारा प्रभाव हे होतं. तेलाच्या निर्यातीवरून सुरू असलेली चढाओढ हे याच वरवर दिसणारं कारण होतं. हे युद्ध विषारी वायुचा वापर, लहान मुलांचा युद्धामध्ये वापर, बड्या देशांचा आंतरराष्ट्रीय तेलाच्या व्यापारावर चालू झालेलं आंतरराष्ट्रीय राजकारण या गोष्टींमुळे बदनाम ठरलं. हे युद्ध ऑगस्ट २०, १९८८ रोजी इराणने U.N. च्या आदेशाने युद्धविराम स्वीकारल्या वर संपलं.

फ) शांततेशी प्रतिकूल चालू घडामोडी :-
                     “ We are on the BRINK OF WAR with Iran” या अमेरिकेच्या ऑफिशियल स्टेटमेंट नंतर वर्ल्ड वॉर ३ होऊ शकतं असे जगाला अडचणीत पाडणारे इशारे मिळतं आहेत. डोनाल्ड ट्रंपनी IRGC ( Iranian Revolutionary Guard Cops ) या १९७९ च्या इराणीयन क्रांती नंतर निर्माण झालेल्या मिलिटरी आणि कमर्शियल संघटनेला ‘दहशतवादी संघटना’ असे २०१८ मध्ये संबोधले. त्याचं कारण सांगितलं की त्या संघटनेने ‘अल कायदा’ या दहशतवादी गटाचं समर्थन केलं. मात्र ही बाब पुढे ढळढळीत खोटी निघाली. IRGC ने अल कायदाचं समर्थन केलं नव्हतं. मात्र ९/११ नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कॉंग्रेसला न विचारता दहशतवादावर निर्णय घेण्याच्या अधिकाराचा ट्रंपनी गैरफायदा उठवला. इराण- अमेरिका हे युद्ध होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अमेरिका त्यादृष्टीने तयारीला लागली सुद्धा आहे. बघूया पुढे काय होतयं ते. हे धार्मिक – राजकीय – आर्थिक युद्ध आपल्याला कुठे घेऊन जातयं ते पाहूया.
                                                                    -श्रेयस-सर्वेश 
Content in blog is subjected to copyright.


टिप्पण्या

Trending

आयुष्य

वैज्ञानिक दृष्टिकोन

मुक्त ती