धर्म स्वातंत्र्य- पार्ट 2

     
Image by :- Sarvesh.

    सेक्युलॅरिझम. विवादित शब्द. प्रत्येक पार्टी आमचंच सेक्युलॅरिझम खरं असा खुळखुळा वाजवते, हा आमचाच मक्ता आहे असं सांगत असते. या संज्ञेच्या 'व्यक्ती तितक्या व्याख्या' आहेत. पण आजपर्यंत खरं सेक्युलॅरिझम कुठल्याचं पार्टीने सांगितले नाही. तर जाणून घेऊया, संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेला सेक्युलॅरिझम काय आहे ते!
     सेक्युलॅरिझमचे मराठीत अर्थपुर्ण भाषांतर करता येत नाही. निधर्मी, अधर्मी, धर्मातीत, इहलोकवादी, अगदी धर्मनिरपेक्षता हा शब्दही या संज्ञेचा नीट अर्थ स्पष्ट करत नाही. त्यामुळे या शब्दाच्या भाषांतराच्या भानगडीत न पडता आपण ही संकल्पना समजावून घेण्याकडे लक्ष देऊयात.
     भारतात अनेक धर्म आहेत, म्हणून सेक्युलॅरिझमची आवश्यकता आहे, हा समज चुकीचा आहे. जरी भारतात हिंदू हा एकचं धर्म असता, तरीही आज सेक्युलॅरिझम ची जितकी गरज आहे, तितकीचं गरज भासली असती. कारण सेक्युलॅरिझमचा जन्म दोन धर्मांच्या संघर्षातून होत नाही तर माणसाच्या पारलौकिक आणि ऐहिक या दोन जीवनाच्या संघर्षातून होत असतो.
     पारलौकिक जीवनावर धर्माचे मर्यादित अधिपत्य तर ऐहिक जीवनात प्रशासनाचे , कायद्याचे सार्वभौमत्व मान्य करणे हे सेक्युलॅरिझमचे सार आहे. भारतीय संविधानाची ही भूमिका आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर धर्म म्हणजे 'माणसाच्या फक्त पारलौकिक जीवनाबाबत विचार करणारी संस्था किंवा संकल्पना' असं सेक्युलॅरिझम मानतो. इहलौकिक किंवा सार्वजनिक आयुष्यावर , आचारांवर बंधन टाकणं हा सर्व धर्मांच्या विचारांचा पाया आहे. आणि धर्मांचा इहलौकीक बाबींमधील प्रभाव नाममात्र करुन धर्माला फक्त पारलौकिक बाबींपुरतं मर्यादित ठेवणं हा सेक्युलॅरिझमचा गाभा आहे.
      त्यामुळे सेक्युलॅरिझम हा धर्मद्रोह मानला जातो. कारण सेक्युलॅरिझम धर्मसत्तेचा माणसाच्या जीवनावर जन्मल्यापासून मरेपर्यंत असलेल्या वर्चस्वाला नाममात्र करतो. धर्मातील गुलामी, जातीयता, अनिष्ट रुढी यांपासून सेक्युलॅरिझम लोकांची सुटका करतो. 
      भारतीय संविधानातील सेक्युलॅरिझमच्या मते प्रत्येक नागरिकाला धर्माबद्दल स्वातंत्र्य आहे. ज्यांना नास्तिक व्हायचे असेल ते नास्तिक होऊ शकतात. ज्यांना जडवादी व्हायचं ते जडवादी होऊ शकतात. ज्यांना एखाद्या धर्मात राहून त्याच्या काही पध्दती सोडायच्या, ते त्या पद्धती सोडू शकतात. धर्मसत्तेला व्यक्तीचं नियंत्रण करता येणार नाही. व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकतात. धर्मत्याग करू शकतात. धर्मविषयक बाबतीत प्रत्येकाचं स्वातंत्र्य हा सेक्युलॅरिझमचा गाभा आहे.
      संवैधानिक कायदा सर्वश्रेष्ठ असल्याने कायद्याच्या विरोधात जाणारा सार्वजनिक जीवनाचा भाग धर्माच्या कक्षेतून रद्द होतो. धर्मसंस्था संविधानाच्या विरोधात काहीही करू शकत नाही. सार्वजनिक व्यवहार राजसत्तेच्या ताब्यात असायला हवा असं सेक्युलॅरिझम मानतो. खाजगी जीवनातील धर्मस्वातंत्र्य सामान्य नितीमत्ता , शिष्टाचार, आरोग्य आणि सार्वजनिक हित यांच्याविरोधात वापरता येणार नाही. या भूमिकेमुळे भारतीय सेक्युलॅरिझम लोकशाही, जीवनाचं आधुनिकीकरण, व्यक्तिस्वातंत्र्य यांच्याशी बांधलेला आहे. सर्वांना समान हक्क व न्याय देणारा आहे. 
      मात्र वास्तवात जे चाललंय ते याच्या अगदी विरोधी आहे.  न्यू दिल्ली च्या लॅटेन्स भागात संविधान जाळलं जातं. सेक्युलॅरिझम वर आधारित भारतीय संविधान नागरिकांना सर्वप्रथम भारतीय बनायला शिकवतं. सेक्युलॅरिझम वास्तवात जर राजकीय पक्षांनी अंमलबजावणीत आणलं तर मुळ मुद्द्यांवर लक्ष देता येईल. अनेक सामाजिक प्रश्न सुटतील. नाहीतर अस्मितेचं इमोशनल राजकारण देशाला कुठं घेऊन आलंय हे तुम्ही बघतायचं.शेवटी देश बदलेल का नाही हे माहिती नाही मात्र लोकशाहीने योग्य प्रतिनिधींना निवडून देणारे पुढच्या पिढीतील 'नागरिक' सेक्युलॅरिझम मुळे घडले तर काहीतरी बदल झाला असं म्हणता येईल.
                                                       -(समाप्त)
 -writing, Image, Draft, Editing:-        Sarvesh Sawakhande
-Concept Idea:- Shreyas Sawakhande.
      
      
     
         
          
            

टिप्पण्या

Trending

आयुष्य

वैज्ञानिक दृष्टिकोन

मुक्त ती